गुलाबी कविता करायला वयाची अट नसते. पण योग्य वयात केलेल्या गुलाबी कवितेची लाली देखिल काही औरच असते .... ती करणारय़ा 'कवी'साठी! तर अशीच योग्य वयात सुचलेली ही एक गुलाबी कविता. आवडली तर प्रतिभा समजा, नाही आवडली तर वयाचा दोष समजा -
ना कळे कधी, तुझिया प्रति
हे भाव मधुर मनी दाटले
अस्वस्थ मी, अस्वस्थ ग,
हे काय मजला जाहले
दिसतेस तू, चाफे-कळी
की तारका, नभीची कुणी
स्मित-हास्य ते कवितेपरी
नक्षत्र धरी जणू उतरले
अस्वस्थ मी, अस्वस्थ ग,
हे काय मजला जाहले
सहवास तुझा, ग मृण्मयी
मिळण्या हे मन आतूरले
पुसण्या परि, धीर ना तरी
भय-रूपी राक्षस मातले
अस्वस्थ मी, अस्वस्थ ग,
हे काय मजला जाहले
नि मग एकदा, कळले मला
हृदयी तुझ्या वसतो कुणी
नैराश्य ते गगनापरी
मन:पटल व्यापुनी राहिले
अस्वस्थ मी, अस्वस्थ ग,
हे काय मजला जाहले
समजेल का मजला कधी
काय ईश्वरा तुझिया मनी
भेटेल का रे मज कधी
ती मानसी हृदयातली?
उत्तरे जरी प्रश्नांची या
मी शोधितो सगळीकडे,
प्रेषित का शापित मी, परि
ना समजले, ना उमगले
अस्वस्थ मी, अस्वस्थ ...
अरे हे काय मजला जाहले
Saturday, January 2, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
1 comment:
भय-रूपी राक्षस मातले... this line is awesome...
u r on right track buddy...
Vayacha dosh... dusara kay?
;-)
Post a Comment