Monday, April 26, 2010

लिनक्स, विंडोज आणि कुसुमाग्रज

Linux आणि Windows या दोन Operating systems आहेत हे आपल्याला माहिती असेलच. Windows वापरणारे आणि linux वापरून पुन्हा नाईलाजास्तव windows platform वर परतावं लागलेले लोक windows ला किती दात-ओठ खाऊन नावं ठेवतात त्याचीही आपल्याला कल्पना असेल. पण मी आत्ता जो एक वेगळा angle तुम्हाला सांगणार आहे तो मात्र नक्कीच तुम्हाला नविन असेल याची खात्री आहे मला.

मराठीचा अभ्यास ज्यांनी केलाय किंवा ज्यांना साहित्याची थोडीफार का होइना जाण आहे, त्यांना कुसुमाग्रजांच्या कविता माहित असायला काही हरकत नाही. आता तुम्ही म्हणाल linux/windows आणि कुसुमाग्रजांच्या कविता यांचा काय संबंध आहे? संबंध आहे. कुसुमाग्रजांच्या कवितांचा कुठलाही पूर्वग्रह न ठेवता बारकाईने अभ्यास केल्यास असं दिसून येईल की, तुमच्या-आमच्या सारख्या मर्त्य मानवांनाच नाही तर कुसुमाग्रजांसारख्या दैवी कवीला देखिल windows चा प्रचंड उबग आला होता अणि त्यांचं सुद्धा linux वर खूप प्रेम होतं.

एक उदाहरणच घ्या ना. त्यांच्या 'पृथ्वीचं प्रेमगीत' या कवितेमधलं एक कडवं पहा -

'परि भव्य ते तेज पाहून पूजून
घेऊ गळ्याशी कसे काजवे
नको क्षुद्र शृंगार तो दुर्बळांचा
तुझि दूरता त्याहुनी साहवे'

आता वर वर पाहता हे एक प्रेमगीत वाटतं. पृथ्वीनं सूर्याला लिहिलेलं. कुसुमाग्रजांनी कवितेला नावही तसंच दिलंय पहा. जेणेकरून कुणा सोम्या-गोम्याला संशय येऊ नये. पण खरा अर्थ लावायचा झाला तर कुसुमाग्रजांनी या ओळी linux ला संबोधून लिहिल्या असाव्यात असं दिसतं.

पहिल्या ओळीत ते म्हणतात -
'परि भव्य ते तेज पाहून पूजून'

कुसुमाग्रज linux च्या stability, reliability, developer-friendliness, opensource philosophy यांसारख्या गुणांनी किती प्रभावित झाले असावेत ते यावरून लक्षात येतं. पुढं जाउन ते विचारतात की linux मधे एवढे सगळे गुण असताना -

'घेऊ गळ्याशी कसे काजवे'

इथं 'काजवे' म्हणजे windows असा अर्थ त्यांना अभिप्रेत असावा. Linux एवढं powerful आणि reliable असताना, windows सारखी powerless, buggy, closed-source आणि monopolistic system कशी वापरायची असा साहजिक प्रश्न ते विचारतात आणि म्हणतात -

'नको क्षुद्र शृंगार तो दुर्बळांचा'

इथं दुर्बळ म्हणजे पुन्हा windows. घडीघडीला छोट्या छोट्या कारणांवरून crash आणि restart होणार्‍या windows ला ते अतिशय मर्मिकरित्या दुर्बळ म्हणून संबोधतात. त्याही पुढे जाऊन ते windows ने पुरवलेल्या भड़क graphical effects, GUI, screen-saver अशा डोळ्यांचं समाधान करणार्‍या पण व्यावहारिक जीवनात काडीचाही उपयोग नसणार्‍या facilities ना 'क्षुद्र शृंगार' अशी शेलकी उपमा देऊन म्हणतात -

'तुझी दूरता त्याहुनी साहवे'

म्हणजे linux जरी तिकडं दूर अमेरिकेतल्या server वर run होंत असेल आणि इथून भारतातून त्या linux server ला connect करायसाठी जरी PuTTY चा वापर करावा लागत असेल तरीही दुर्बळांच्या (windows च्या) क्षुद्र शृंगारापेक्षा (भड़क GUI पेक्षा) ते तेजःपुंज आणि powerful असं PuTTY चं काळं command-line terminal केंव्हाही बेहेत्तर! या ओळीवरून कुसुमाग्रजांनी त्याकाळात देखिल उत्सुकतेपोटी अणि linux प्रेमापोटी PuTTY वापरून दूरदेशीच्या एखाद्या linux server ला connect केलं असण्याची दाट शक्यता वाटते. असो.

या खळबळजनक संशोधनाबद्दल वाचल्यानंतर तुमच्या मनात या संशोधाकबद्दल नितान्त आदर निर्माण होणं साहजिक आहे. पण तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की या गुणवान संशोधकाला बारावीच्या परीक्षेत मराठीमधे १०० पैकी ३५ गुण मिळाले होते. IT field मधे दिवसभर घाम गाळुन काम करणार्‍या, आणि थकून-भागून घरी आल्यानंतर देखिल अथक संशोधन करून कुसुमाग्रजांच्या कवितांकडे बघण्याची एक वेगळी नजर जगाला देणार्‍या होतकरू मराठी अभ्यासकाला बारावीसारख्या महत्वाच्या वर्षी मातृभाषेच्या परीक्षेत काठावर उत्तीर्ण करणार्‍या त्या परिक्षकाचा धिक्कार असो! आईनस्टाईनला सुद्धा लहानपणी गणितात खुप कमी गुण मिळायचे म्हणे. पण तो निदान तिकडं यूरोपात तरी होता. इथं भर महाराष्ट्रात झालेल्या या एका मराठी-भाषिकाच्या गळचेपिचा मुद्दा राज ठाकरेंनी संसदेत उपस्थित करावा अशी माझी इच्छा आहे. असो. यावर परत केंव्हा तरी बोलू.

तर हा लेख वाचल्यानंतर तुम्हाला हिंसाचार करायची बुद्धि झाल्यास तो बौद्द्धिक पातळीवर करावा. ज्यावर हा लेख वाचताय तो संगणकही तुमचाच आणि तुमच्या डोक्यावरचे केसही तुमचेच हे ध्यानात असुद्या.


टीप:
या कवितेतील इतर कडव्यांचे अणि कुसुमाग्रजांच्या इतर कवितांचे linux अणि windows शी संबंधित अन्वयार्थ - यावरपुढील संशोधन सुरु आहे. या घडीला या एका कडव्याशिवाय इतर काही प्रकाशित करता येणार नाही. संशोधन पूर्ण होताचयोग्यवेळी सर्व गोष्टी उघड करण्यात येतील. चिकित्सा करण्याचा मोह आवरल्याबददल धन्यवाद.