Monday, May 17, 2010

पिपात मेल्या ओले उंदीर

बा. सी. मर्ढेकरांची 'पिपात मेले ओल्या उंदीर' वाचल्यापासून मी खूप अस्वस्थ आहे.

झेपलीच नाही मला बिलकुल.

आणि त्याहून जास्त त्रास मला कशाचा झाला असेल तर तो मर्ढेकरांच्या शब्दरचनेचा.

'पिपात मेले ओल्या उंदीर' पेक्षा 'पिपात ओल्या मेले उंदीर' जास्त समर्पक आणि सरळ-सोपं झालं नसतं का?
का 'ओल्या' हे विशेषण पिपाबद्दल आहे हे प्रयत्नपूर्वक समजून घ्यायचा मानसिक त्रास द्यायचाच लोकांना?

हा जो त्रास मला झाला/अजुनही होतोय, त्यावरचा उतारा म्हणून, आणि त्याचा सूड म्हणून, केलेलं हे त्या कवितेचं विडंबन.

विडंबन वाचण्याआधी मूळ कविता वाचलीत तर, न जाणो, तुम्हाला हे विडंबन आवडूनही जाईल कदाचित. मूळ कवितातुम्हाला इथे वाचायला मिळेल.

विडंबनाचा विषय तसा थोडा अतरंगीच आहे. विडंबनच अतरंगी, मग विषयाला का सोडा? असो. तर एक सांगकाम्या-ओं-नाम्या नोकर एकावर एक 'फ्री' मिळालेला पिंप उघडून न पाहता तसाच घेउन येतो. त्याची मालकीण तो उघडून बघते मात्र, आणि तिच्या मुखातून आलेलं, त्या नोकराबद्दल तिला असलेला आदर, प्रेम, आपुलकी, जिव्हाळा दर्शवणारं, शब्दांमृत, म्हणजे हे काव्य -

---------------------------------------------------------------

पिपात मेल्या ओले उंदीर
असे आणलेसंच कसे, बघितल्याविण

फुकट मिळाले म्हणुनी आणशी
न बघता तू, बुद्धिहीन

बीळ सोडुनी सांग कसे ते
पिपात (या) आले ओले होऊन?

दिवस सांडला बोंबलत फिरण्यात
या गिळायला, आता हातपाय धूऊन

अंगात ना काही शक्ती आहे,
डोक्यात ना कुणी युक्ती आहे.

पोरींवरती लहरी डोळे
फेकशी पण

मधाळ स्मित;
त्या ओठांवरचे, ते ही
बेकलाइटी, बेकलाइटी!

रागाने करीसी पिंप आडवे,
पिपात(ले) उंदीर पळाले! पळाले!

---------------------------------------------------------------


आवडेल, न आवडेल कुणास ठाउक. नाही आवडलं तर तुमच्या भावना पोहोचवण्यासाठी comments section आहेच.

पण जर चुकून माकून आवडलं, तर त्याचं श्रेय अत्र्यांना. कारण डोक्यात गेलेला हा किडा झेंडूच्या फुलांतून आला असावा असं माझं self assessment आहे.